कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी निर्मित आकाश कंदील, उटणे, पणत्या यांचे भव्य प्रदर्शन

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी निर्मित आकाश कंदील, उटणे, पणत्या यांचे भव्य प्रदर्शन

 

सावंतवाडी

 

          सावंतवाडी येथील प्रसिद्ध सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सावंतवाडी अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या छोट्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीमध्ये स्वतः निर्मिती केलेले आकाश कंदील, पणत्या, उटणे, कागदी पणत्या यांचे भव्य प्रदर्शन भरवले व सदर वस्तू विक्रीसाठी लावण्यात आल्या. या प्रदर्शनाला तथा विक्री केंद्राला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मुलांच्या वस्तू खरेदी केल्या. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगीत कागदाचे कंदील तयार करून त्यावर सुंदर सजावट केली. तसेच विविध रंगाच्या पणत्या रंगवणे, सुगंधी उटणे तयार करणे, कागदी पणत्या तयार करणे अशा वस्तू गेले दोन दिवस ही मुले शाळेमध्ये करत होती. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक गुणांना पालकांनी दाद दिली. सोबतच निर्माण केलेल्या उत्पादनाला बाजारामध्ये कसे विकावे? याचेही धडे या शाळेच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावेळी मुलांना दिले. ही छोटीशी इयत्ता पहिली ते चौथीची मुले आर्थिक व्यवहार, खरेदी- विक्री यांसारखे गुण अशा उपक्रमातून शिकताना दिसत आहेत. यावेळी या अभिनव उपक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस,संचालिका नम्रता नेवगी, पालक वर्ग, हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शाळा व्यवस्थापनचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, माध्यमिक/ प्राथमिक चे शिक्षक यांनी भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या डी.जी.वरक,अमित कांबळे,ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले,स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर, लोके मॅडम या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. हा उपक्रम शाळेच्या पटांगणावर घेण्यात आला.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सावंतवाडी परिसरात पालक वर्गातून कौतुक होत आहे.