आफताब शेख आत्महत्या प्रकरण........राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली दखल

आफताब शेख आत्महत्या प्रकरण........राज्य अल्पसंख्याक आयोगाने घेतली दखल

 

मुंबई

 

      राज्य अल्पसंख्याक आयोगाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील आफताब शेख आत्महत्येप्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गावात मुस्लीमवाडी येथील आफताब शेख यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने स्वतः व्हिडिओ करून आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाच जण जबाबदार असल्याचे म्हटले होते. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर समोर आले होते. या व्हिडिओ मध्ये त्यांनी काही स्थानिकांवर अत्याचार आणि धमक्यांचा आरोप केला होता. मात्र, मयत आफताब यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल करूनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांना जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला होता. मृत्यूच्या घटनेनंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती, ज्यामुळे प्रकरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचे आदेश राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत देण्यात आले आहेत.आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई अहवाल देण्याची सूचनाही राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या या आदेशामुळे प्रकरणाला नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.