शिरोडा वेळागर शोध मोहीम यशस्वी.....दोन मृतदेह समुद्रातून बाहेर काढले

शिरोडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर समुद्रकिनारी ३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या भीषण अपघातानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला आज यश मिळाले. या अपघातात बुडालेल्या सात पैकी अखेरचे दोन मृतदेह पोलिस, महसूल प्रशासन आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
मृतदेहांची ओळख
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६ वर्षे): केळुस, निवती येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला गेला.जाकीर निसार मणियार (वय १३ वर्षे): नवाबाग समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला पोलिसांच्या मदतीने बोटीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.दोन्ही मृतदेहांची ओळख नातेवाईकांनी खात्री केली आहे. मृतदेह शिरोडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून, अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन कायदेशीर कारवाई सुरू आहे.ही मोहीम पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साठम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. मत्स्य विभागाच्या ड्रोन्सचा वापर करून सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्राची तपासणी करण्यात आली. एचडीएम निकम आणि तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या सहभागाने महसूल प्रशासनानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्थानिक मच्छीमार आणि नौसेनेच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात लवकरच सोपवले जाणार आहेत.