तुळशी विवाह

तुळशी विवाह

       

     कार्तिक महिन्याचा सुगंध वातावरणात दरवळू लागतो आणि दिवाळीनंतर घराघरांत पुन्हा एकदा सणासारखे वातावरण जाणवू लागते. हा दिवस असतो कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा दरम्यान साजरा होणाऱ्या तुळशी विवाहाचा. २ नोव्हेंबरच्या या मंगलप्रसंगी संपूर्ण गावात पुजापाठ, सजावट, घंटाध्वनी आणि हरिनामाचा गजर घुमू लागतो.
      एके काळी धरणीवर जालंधर नावाचा एक बलशाली असुर राजा होता. त्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेच्या प्रभावाने देवताही त्याला हरवू शकत नव्हत्या. विष्णूंनी युक्ती करून तिची परीक्षा घेतली आणि तिची पतिव्रता नष्ट झाल्यानंतर जालंधर युद्धात मरण पावला. हे पाहून वृंदेने विष्णूंना शाप दिला—"तुम्ही दगड व्हा!" आणि ती स्वतः अग्नीत विलीन झाली.विष्णूने तिच्या पवित्रतेचा सन्मान म्हणून तिच्या देहातून तुळशीचा उद्भव केला. पुढे विष्णूंनी शालिग्राम रूप धारण केले आणि दोघांचा विवाह दिव्य तेजात संपन्न झाला. तेव्हापासून तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली.
    तुळशी व शालिग्रामाचा विवाह हा प्रतीकात्मक देवविवाह आहे. घरात किंवा देवळात सुंदर मांडव उभारला जातो, तुळशी वृंदावनाला वधूसारखी साज चढवली जाते. देव शालिग्रामाला वरपक्षाच्या रूपाने बैलगाडीत, डोल्यात किंवा थाळीत आणले जाते. मंगलाष्टकाच्या तालावर लोक हरिनाम गातात, आरत्या म्हणतात, आणि विवाहानंतर ओटीभरून बक्षीसे दिली जातात.या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवविवाहित जोडपी किंवा मुली तुळशीच्या लग्नात सहभागी होतात, व प्रेम, नात्याची पवित्रता आणि समृद्ध जीवनासाठी आशीर्वाद मागतात.
       तुळशी विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तो भक्तीचा उत्सव आहे. घरोघरी दीपज्योतीने झगमगणारे अंगण, तुळशीसमोर धुपाचा सुगंध, आणि मंगलध्वनीत न्हालेल वातावरण. या सगळ्यामुळे मनात एक अद्भुत शांती निर्माण होते. भक्त तुळशीवृंदावनाकडे पाहून प्रार्थना करतात, “हे देवी वृंदा, आमच्या जीवनातही असा शुद्ध प्रेमबंध नांदो.”
        तुळशी विवाह आपल्याला शिकवतो की शुद्धता, प्रेम आणि निष्ठा या तीन गोष्टी जीवनात सर्वात मोठ्या आहेत. विष्णू आणि वृंदेची कथा दाखवते की खरी भक्ती अमर असते. आजही या दिवशी केलेली प्रार्थना, तुळशीची पूजा आणि तिच्याप्रतीची निष्ठा हे सर्व आपल्यास आत्मिक उन्नतीकडे नेणारे मार्ग आहेत.
      तुळशी विवाहाचा हा सुंदर उत्सव आपल्याला पुन्हा एकदा भक्तीची आठवण करून देतो. या सणाच्या झगमगाटात सहभागी व्हा, तुळशीसमोर दीप लावा, आणि मनोभावे हरिनामाचा गजर करा. कारण त्या दिव्य तेजातच खरे समाधान दडलेले असते.