कणकवलीत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी हवी - समीर नलावडे
कणकवली
कणकवली शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये भाजपाचे एकापेक्षाही अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षातील प्रत्येक निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळायला हवी, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली आहे. तसेच पर्व १७ प्रभागातील इच्छुक भाजप उमेदवारांची नावे पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे ते म्हणाले.समीर नलावडे यांच्या निवासस्थानी आज शहरातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत शहरातील प्रत्येक प्रभागातील पक्षनिष्ठ इच्छुक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून ती यादी पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.गेल्या अनेक वर्षांपासून नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता आहे. पक्षात दाखल झाल्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले असून त्यांची जनतेशी घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत.दरम्यान, उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन या इच्छुक कार्यकर्त्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे. तसेच पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी बैठकीत घेतलेली भूमिका या नेत्यांना सांगण्यात येईल, अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.

konkansamwad 
