महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार : मंत्री शंभूराज देसाई.
मुंबई.
नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्यासाठी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा केला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.राज्यात लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडली होती.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, या कायद्याअंतर्गत 662 सेवा अधिसूचित केल्या आहेत. हा कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत 16 कोटी 42 लाख 47 हजार पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. 15 कोटी 53 लाख 29 हजार पेक्षा अधिक अर्जावर कार्यवाही केली आहे. जवळपास 94.57 टक्के हे प्रमाण आहे. या कायद्याने नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सर्व विभागांनी वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देत या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल.
नागरिकांना कालबद्ध सेवा मिळण्यासाठी आणि शासनाची प्रतिमा अधिक उंचाविण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य बच्चू कडू, अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला होता.