अवकाळी पाऊस – परतीचा पाऊस की परतीचे दुःख ?
पाऊस म्हटला की मनाला एक वेगळे समाधान लाभते. आकाशात काळे ढग दाटून येतात, विजांच्या कडकडाटासह सरी कोसळतात आणि धरती हिरवाईने बहरते. पण जेव्हा हा पाऊस वेळ पाहत नाही, तेव्हा आनंदाऐवजी चिंता वाढते. सध्या ऑक्टोबर संपला आणि नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. तो थांबायचे नाव घेत नाही. हा पाऊस ‘परतीचा पाऊस’ मानला जातो, पण यावेळी तो परतीचे ‘नाव’ घेईना, असेच म्हणावे लागेल.
या अवकाळी सरींनी शेतकऱ्यांच्या दुनियेत दरवर्षी संकट ओढवले आहे. तयार उभे असलेले सोयाबीन, भात, उडीद, तूर, कापूस अशी पिके या मुसळधार सरींमुळे अर्धवट झाली आहेत. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून जी शेती फुलवतो, ती काही तासांच्या सतत पावसामुळे उद्ध्वस्त होते, हे किती वेदनादायी आहे! गावात, पाझरत असलेल्या नद्या आणि बंधाऱ्यांमुळे शेत चिखलात बदलताना दिसतात. पिके गळतात, बीज वाया जाते, आणि त्यासोबत शेतकऱ्यांच्या कष्टांचे स्वप्न धुऊन जाते. हवामानातील या अनिश्चित बदलामुळे शेतकऱ्याला आता फक्त आकाशाकडे पाहून निर्णय घेणे परवडत नाही. परंतु, परिस्थिती अशी आहे की तो काही करूही शकत नाही. शासनाच्या उपाययोजना, विमा योजना आणि हवामानाचा अंदाज हे सगळे असले तरी, निसर्गाच्या मनमानीपुढे मानवाचे हात लहानच पडतात. हा परतीचा पाऊस पूर्वी थोडासा ओलावा निर्माण करणारा, रब्बी पिकाला उभारी देणारा असायचा. पण आता हवामानाच्या बदललेल्या रचनेमुळे हा पाऊस अपूर्व वेळी आणि अपूर्व प्रमाणात येतो. त्यामुळे तो परतीचा नसून, परत न जाणारा समस्या बनला आहे. खरं तर, पावसाचा ऋतू संपल्यानंतर आकाशात सूर्याची उब हवी असते, पिकांना उन्हाची गरज असते. पण ढग हटत नाहीत, थेंब थांबत नाहीत. शेतकरी म्हणतो, “पाऊस आहे, पण वेळ नाही!” या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्याने धैर्य सोडून चालणार नाही. जसा तो प्रत्येक वर्षी नव्या अपेक्षेने बियाणे पेरतो, तसाच निसर्गावर विश्वास ठेवावा. बदलत्या हवामानासोबत शेतीच्या पद्धतीत बदल करण्याची, टिकाऊ शेती पद्धती अंगीकरण्याची हीच वेळ आहे.

konkansamwad 
