सावंतवाडी-कुडाळ महामार्गावर कोलगाव येथे भीषण अपघात.....दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू.....

सावंतवाडी-कुडाळ महामार्गावर कोलगाव येथे भीषण अपघात.....दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू.....

सावंतवाडी

 

     सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्गाजवळ दुचाकी आणि चारचाकी कार यांच्यात झालेला भीषण अपघात दुर्दैवी ठरला आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाने उपचारादरम्यान प्राण गमावले. आयुषी देसाई असे जागीच मृत झालेल्या तरुणीचे नाव असून, कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील मियासाब समाधीजवळ दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात हा अपघात घडला. स्विफ्ट कार सावंतवाडीच्या दिशेने जात होती, तर दुचाकी कुडाळच्या दिशेने जात असताना दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तरुण आणि तरुणी दोघेही उडून रस्त्यावर फेकले गेले. यात आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब हे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या तीव्रतेमुळे समोरून येणारी स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लादू रायका यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील स्विफ्ट कारच्या चालकाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार श्री. राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार श्री. धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब हे पुढील तपास करत आहेत.