तरुणांना रोजगार देऊन आर्थिक सक्षम करणेच उद्दिष्ट - पालकमंत्री नितेश राणे

तरुणांना रोजगार देऊन आर्थिक सक्षम करणेच उद्दिष्ट - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग, दि. ३०

 

      देवगडच्या पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिक तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच उद्दिष्ट असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.देवगड किल्ल्यावरील खंदक उद्यान आणि शहरातील वाय जंक्शन सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, माजी आमदार अजित गोगटे, अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले पालकमंत्री?
या दोन विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. खंदक उद्यानामुळे 500 जणांना थेट तर हजारो जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. लवकरच देवगडमध्ये ताज समूहाचा प्रकल्प आणि जिल्ह्यात गोवा शिपयार्डचा विस्तार होणार असून त्यातून 25 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खंदक उद्यानाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा तर आनंदवाडी बंदराचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कामांची माहिती
1. वाय जंक्शन सुशोभीकरण : सिंधुरत्न योजनेतून 80.72 लाखांचा निधी मंजूर.
2. खंदक उद्यान विकास :जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटीचा निधी मंजूर. यामध्ये दोन बुरुज, 200 मीटर पादचारी मार्ग व इतर सुविधांचा समावेश आहे.