सावंतवाडी रोड स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा
सावंतवाडी
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असून संबंधित गाड्यांच्या वेळाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुंबई सीएसएमटी - मंगळुरू - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (गाडी क्र. 12133/12134) या दैनंदिन गाडीला 26 जुलै 2026 पासून सावंतवाडी रोड येथे थांबा मिळणार आहे. गाडी क्र. 12133 सकाळी 7.02 वाजता येऊन 7.04 वाजता सुटेल, तर गाडी क्र. 12134 रात्री 11.30 वाजता येऊन 11.32 वाजता सुटेल. ही सेवा 27 जुलै 2026 पासून लागू होईल.
हजरत निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल 'राजधानी' एक्स्प्रेस (गाडी क्र. 12432/12431) या त्रिसाप्ताहिक गाडीचाही सावंतवाडी रोड येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. गाडी क्र. 12432 सकाळी 6.18 वाजता येऊन 6.20 वाजता सुटेल. ही सुविधा 26 जुलै 2026 पासून लागू होईल. तर गाडी क्र. 12431 सकाळी 9.44 वाजता येऊन 9.46 वाजता सुटेल. ही सेवा 28 जुलै 2026 पासून सुरू होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नॉर्थ 'गरीब रथ' एक्स्प्रेस (गाडी क्र. 12201/12202) या द्विसाप्ताहिक गाडीचाही सावंतवाडी रोड येथे प्रायोगिक थांबा देण्यात आला आहे. गाडी क्र. 12201 पहाटे 2.02 वाजता येऊन 2.04 वाजता सुटेल. ही सेवा 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. तर गाडी क्र. 12202 पहाटे 3.28 वाजता येऊन 3.30 वाजता सुटेल. ही सेवा 30 जुलै 2026 पासून लागू होईल. प्रवाशांनी या नव्या सुविधेची नोंद घ्यावी, तसेच संबंधित गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि इतर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
konkansamwad 
