वेंगुर्ला शहरात तीन दिवस ई-कचरा संकलन अभियान......घरातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करण्याचे आवाहन

वेंगुर्ला शहरात तीन दिवस ई-कचरा संकलन अभियान......घरातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करण्याचे आवाहन

वेंगुर्ले

 

   वाढत्या ई-कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय धोक्याला आळा घालण्यासाठी वेंगुर्ला नगर परिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विशेष ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत वेंगुर्ला शहरात चार संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रे २८, २९ आणि ३० ऑक्टोबर २०२६ या तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत.नागरिकांच्या घरात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून त्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील जुने मोबाईल फोन, चार्जर, केबल्स, इअरफोन, कीबोर्ड, माऊस, संगणकाचे सुटे भाग, जुने रिमोट, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर कोणताही ई-कचरा आपल्या जवळच्या संकलन केंद्रावर आणून जमा करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.ई-कचरा उघड्यावर फेकल्यास जमीन आणि पाण्याचे प्रदूषण होते, त्यामुळे अशा अभियानातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी हातभार लावावा.

संकलन केंद्राची ठिकाणे
१. हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला
२. दाभोली नाका, वेंगुर्ला
३. वेंगुर्ला नगर परिषद कार्यालय
४. घोडेबाव गार्डन, वेंगुर्ला

अभियानाचा कालावधी - २८ ते ३० ऑक्टोबर २०२६
वेळ - सकाळी ९ ते दुपारी १

अधिक माहितीसाठी संपर्क - ९१७५००७०८७