कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा जाहीर....रोजगाराभिमुख शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा जाहीर....रोजगाराभिमुख शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध

कुडाळ

     जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली टप्पा पार पडला असून, येथील नामांकित संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) अधिकृतपणे 'स्वायत्त दर्जा' (Autonomous Status) घोषित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यधारित, व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी स्वायत्त दर्जाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मुंबई विद्यापीठाशी असलेली संलग्नता कायम ठेवून आता युजीसीच्या नियमांनुसार अभ्यासक्रमांची रचना, अध्यापन पद्धती, परीक्षा आणि मूल्यमापन याबाबत महाविद्यालयाला पूर्ण शैक्षणिक स्वातंत्र्य मिळणार आहे. या स्वायत्ततेमुळे स्थानिक गरजा आणि रोजगाराच्या वाढत्या संधी विचारात घेऊन नवे कौशल्यधारित अभ्यासक्रम विकसित करणे शक्य होईल. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी, पर्यावरण संवर्धन, डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रांशी संबंधित शिक्षण व संशोधनाला यामुळे मोठा वेग मिळणार आहे. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने १९८४ मध्ये संत परमपूज्य राऊळ महाराज यांच्या नावाने या महाविद्यालयाची स्थापना केली होती. स्थानिक स्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या महाविद्यालयाने कालांतराने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. सध्या येथे संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अकाऊंटिंग अँड फायनान्स यांसारख्या अभ्यासक्रमांसह पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) या क्षेत्रांतही महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, २०१० मध्ये मुंबई विद्यापीठाचा 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार' देखील मिळवला आहे. महाविद्यालयाला हा स्वायत्त दर्जा मिळवून देण्यासाठी संस्थेचे सहकार्यावाह महेंद्र गवस आणि प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी विशेष प्रयत्न केले. या प्राप्त झालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केले. या पत्रकार परिषदेस संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांच्यासह अरविंद शिरसाट, अनंत वैद्य, का. आ. सामंत, महेंद्र गवस, डी. एस. पाटील, राजू परब, शिवाजी घोघोळे, डॉ. रवींद्र जोशी, केदार सामंत, गजानन कांदळगावकर, सागर तेली, प्रतिभा पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.