वेंगुर्ल्यात काँग्रेसचा मोठा निर्णय!......विलास गावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित
वेंगुर्ला
महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल कालपासून वाजले. याच धर्तीवर वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय येथे वेंगुर्ला काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये काँग्रेसकडून नगराध्यक्ष पद तसेच चार नगरसेवक उमेदवारांची खात्रीशीर घोषणा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी श्री. विलास गावडे यांनी आपण काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहे असे घोषित केले याला जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दुजोरा दिला. तसेच विधाता सावंत(प्रभाग क्र.2ब), चेतन कुबल(प्रभाग क्र.5ब), महेश डिचोलकर(प्रभाग क्र.6ब), सतेज मयेकर(प्रभाग क्र.8ब) यांची नगरसेवक पदासाठी घोषणा करण्यात आली आहे.
वेंगुर्ला शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध असून, शहराच्या विकासात्मक कामांना बळकटी देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सारख्या प्रगत कंपनीची नेमणूक करून नियोजनबद्ध विकास साधण्याचा मानस असल्याचे विलास गावडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी म्हटले की, “वेंगुर्ला शहराचा विकास हा सर्वांचा मुद्दा आहे. त्यामुळे मित्र पक्ष आणि इतर सर्वांना सोबत घेऊन सहकार्याच्या भावनेने काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल.” या घोषणेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद म्हटली की निवडणूक कधीच सोपी होत नाही असा आजवरचा इतिहास आहे. नगराध्यक्ष पदाकरीता विलास गावडे रिंगणात उतरणे हे निवडणुकीला अजून रंगतदार बनवणार हे निश्चित.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आत्माराम उर्फ दादा सोकटे, अब्दुल शेख, अंकुश मलबारी, समीर नागवेकर, सुमित डगरे आदी उपस्थित होते.

konkansamwad 
