लांजा येथील ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत उलगडा!......रत्नागिरी जिल्हा पोलिसांची वेगवान कारवाई; संशयित आरोपीला अटक!

लांजा येथील ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत उलगडा!......रत्नागिरी जिल्हा पोलिसांची वेगवान कारवाई; संशयित आरोपीला अटक!

लांजा दि. २१

 

        लांजा तालुक्यातील वेर्वली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या खून आणि सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेर्वली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास वैशाली हेगिष्टे या घरी एकट्याच असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, चोरीचा संशय येऊ नये म्हणून त्यांच्या हातांत नकली बांगड्या घालण्यात आल्याचे तपासात समोर आले.या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३०९(४) आणि ३३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. गुन्ह्याची तातडीने उकल करण्यासाठी तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयातून तपासाला वेग देण्यात आला.पोलिसांनी स्थानिक माहितीचे संकलन, संशयितांची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला. पथकांमधील समन्वय आणि वेगवान कारवाईमुळे काही तासांतच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.तपासादरम्यान घटनास्थळा पासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद प्रकाश खेडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रका नुसार, कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली.या प्रकरणाचा जलदगतीने छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, लांजा पोलीस ठाणे आणि राजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.ज्येष्ठ महिलेच्या खून आणि जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याची अवघ्या १२ तासांत उकल केल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या समन्वित तपासाची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.