म्हापण-परुळे परिसरातील आंबा व काजू उत्पादकांना दिलासा.....बंद पडलेले वेदर स्टेशन नव्या उपकरणांसह पुन्हा कार्यान्वित

म्हापण-परुळे परिसरातील आंबा व काजू उत्पादकांना दिलासा.....बंद पडलेले वेदर स्टेशन नव्या उपकरणांसह पुन्हा कार्यान्वित

कुशेवाडा

 

       म्हापण मंडळातील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले व अचूक हवामान नोंदविण्यात अडचणी येत असलेले वेदर स्टेशन अखेर नव्या उपकरणांसह कार्यान्वित झाले आहे. यामुळे म्हापण-परुळे परिसरातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कुशेवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या या वेदर स्टेशनमध्ये क्लायमेट कंपनीचे पाटील सर यांच्या उपस्थितीत नवीन उपकरणांची स्थापना करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सदर वेदर स्टेशन दुरुस्त करून त्यामध्ये नवीन उपकरणे बसविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, चेतन सामंत व अभय परुळेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रव्यवहार तसेच विविध स्तरांवर प्रयत्न करून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.वेदर स्टेशनमधून मिळणारी अचूक हवामानविषयक माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः आंबा विमा, काजू विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पंचनामे व भरपाई प्रक्रियेसाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यात अधिक अचूक माहितीच्या आधारे योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून संबंधितांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.