वर्दे येथे महाविद्यालयीन तरुणीचा भरवस्तीत निघृण खून; जिल्ह्यात खळबळ

वर्दे येथे महाविद्यालयीन तरुणीचा भरवस्तीत निघृण खून; जिल्ह्यात खळबळ

 

कुडाळ

 

      ओरोस खुर्दनजीक असलेल्या वर्दे गावात एका महाविद्यालयीन तरुणीचा चाकूने वार करून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दामिनी किरण पालव (वय २०, रा. वर्दे-खालची पालववाडी) असे मृत तरुणीचे नाव असून, ती हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. संबंधित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतत होती. आज तिचे वडील बाहेर गेल्याने तिला घ्यायला येऊ शकले नाहीत. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने तिच्यावर धारदार चाकूने वार केले आणि तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओहोळात फेकून घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तात्काळ जेरबंद करण्यासाठी जिल्हाभरात कडक नाकाबंदी करण्यात आली असून, ओरोस येथील जिजामाता सर्कलसह प्रमुख नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांकडून सर्व बाजूंनी तपास युद्धपातळीवर सुरू आहे.