सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांची जयंती साजरी

सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांची जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी

 

     जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल.यामुळे जिल्ह्यातील सहकारी चळवळ अधिक गतिमान होण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या सिंधूनगरी-ओरोस येथील नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापून या नवीन कार्यालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. दि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ (पुणे) अंतर्गत काम करणारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ ही संस्था संपूर्ण जिल्ह्यात सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसिद्धीचे महत्त्वपूर्ण काम करते. दिवंगत शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्ह्यात सहकारी चळवळ निकोप वाढीसाठी मोठे प्रयत्न केले होते, त्यामुळे त्यांच्याच जयंतीदिनी हा सोहळा पार पडला.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा सहकार मंडळाला सिंधूनगरी-ओरोस येथे हे नूतन कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. याबद्दल मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, संचालक विलासराव ऐनापुरे, विनोद मर्गज, तसेच जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर उपस्थित होते. याशिवाय बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळाचे सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.