वृक्ष लागवड सप्ताह मोहिमेचा काँग्रेसतर्फे शुभारंभ
सावंतवाडी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे राज्यभर राबवण्यात आलेल्या 'वृक्ष लागवड सप्ताह' मोहिमेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ झाला. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रशांत परब आणि स्थानिक प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते जयवंत परब, हनुमंत घाडी, बाप्पा वराडकर, विजय सावंत यांच्या सहभागाने मातोंड येथील ग्रामदैवत सातेरीदेवी मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मातोंड येथील सातेरी देवी मंदिराचे मानकरी यांच्या हस्ते मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना बाप्पा नाटेकर यांनी पर्यावरणीय बदलांचे गंभीर दुष्परिणाम आणि त्याचा सर्व जीवसृष्टीवर होणारा परिणाम यावर सखोल माहिती दिली. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून मानवी जीवन कसे सुरक्षित करता येईल, याचे दाखले देत, त्यांनी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही नाटेकर यांनी यावेळी केले.

konkansamwad 
