कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी होणार; तक्रारींनंतर BDO कडून कारवाईचे आश्वासन

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी होणार; तक्रारींनंतर BDO कडून कारवाईचे आश्वासन

कणकवली
 

     कणकवली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांकडून सुरू असलेला मनमानी कारभार तातडीने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) दिला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील कथित अनियमितता आणि बेकायदेशीर कामांबाबत जोरदार जाब विचारला. यावेळी करूळ ग्रामपंचायतीमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची अनधिकृत टाकी हटवण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच ओसरगाव ग्रामपंचायतीमधील दोन सदस्य गेल्या नऊ महिन्यांपासून एकाही मासिक सभेला उपस्थित नसतानाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई का करण्यात आली नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याशिवाय, नियम नियमानुसार मासिक सभेपूर्वी मागील सभांचे इतिवृत्त सदस्यांना मिळणे गरजेचे असताना अनेक ग्रामसेवक ते उपलब्ध करून देत नसल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली. या सर्व प्रकारांची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकांना नियमानुसार काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या गैरप्रकारांवर वेळीच पावले उचलली नाहीत, तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडून संबंधितांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या चर्चेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी मांडण्यात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख विलास घोडेकर, बबली राणी, रवींद्र खंदारे, सिद्धेश राणे, ओमप्रकाश ताम्हाणेकर, बाळा राऊत, तात्या निकम आणि गुरू पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.