स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय....नितेश राणेंचा दावा....जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गय नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय....नितेश राणेंचा दावा....जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गय नाही

सावंतवाडी

 

     सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होणार आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते भाजपसमोर टिकू शकत नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील संवाद आणि विश्वास अधिक दृढ करून पक्षाचे संघटन गावपातळीवर अधिक मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, भाजपचे वरिष्ठ नेते आ. योगेश सागर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा संदर्भ देत पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि समाजात द्यावयाचा संदेश स्पष्ट केला आहे. त्या विचारांचा अंगीकार करून आपण सर्वांनी काम केले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात भाजपच्या ताकदीमुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आल्या. आगामी जिल्हा बँक, ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकांमध्येही उत्तम समन्वय राखून काम केले जाईल. निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षचिन्हाशी प्रामाणिक राहून काम केल्यास जिल्ह्यातील कोणताही राजकीय पक्ष भाजपसमोर आव्हान उभे करू शकणार नाही.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्याचे उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार 'विकसित महाराष्ट्र २०४७'ची भक्कम पायाभरणी करत आहे. शेतकरी कर्जमाफी, मच्छीमारांसाठीच्या योजना, पर्यटन विकास आणि रोजगाराच्या संधी लोकांपर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. शिरोडा येथील नवीन पंचतारांकित हॉटेल आणि तळवणे येथील जहाज बांधणी प्रकल्पासारख्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळत असून परराज्यातील कोकणी तरुण पुन्हा आपल्या मातीकडे परतत आहे. मिळालेल्या अधिकारांचा आणि निधीचा उपयोग केवळ जनसेवेसाठीच व्हावा, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी अवैध धंदे आणि नशामुक्त सिंधुदुर्ग अभियानावर अत्यंत कडक भूमिका घेतली. सावंतवाडी व परिसरातील मटका, जुगार, दारू आणि ड्रग्जसारखे बेकायदेशीर प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाचे नाव किंवा पदाचा वापर करून कोणीही अशा चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.