कंपनीने फसवणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्री केसरकरांनी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत : सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार.

सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरेनियम कंपनीने फसवणूक केलेल्या २१० कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करु नये. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात सुभेदार म्हणतात, सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्या बाहेर काम करावे लागत आहे. गोव्यासारख्या ठिकाणी रोजगारासाठी जाताना आणि येताना अपघात होऊन अनेक युवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करुन केसरकर यांनी लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करु नये. वेरेनियम कंपनी ही दीपक केसरकर यांनीच आणली होती. त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते. त्यांना सिंधूरत्न योजनेमधून अनेक ठेके देण्यात आले होते.मात्र आता कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत.असा आरोप आशिष सुभेदार यांनी केला आहे.