'पवित्र' प्रणालीतील घोळामुळे सिंधुदुर्गातील शिक्षक भरती अडचणीत.....६ वी ते ११ वीच्या सर्व रिक्त जागा तात्काळ दर्शवा - उमेदवारांची मागणी

'पवित्र' प्रणालीतील घोळामुळे सिंधुदुर्गातील शिक्षक भरती अडचणीत.....६ वी ते ११ वीच्या सर्व रिक्त जागा तात्काळ दर्शवा - उमेदवारांची मागणी

 

सिंधुदुर्गनगरी

 

      राज्य शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत 'पवित्र' प्रणालीवर प्राधान्यक्रम नोंदवताना निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पात्र बी.एड. आणि अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण उमेदवार तीव्र चिंतेत सापडले आहेत. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे योग्य रीतीने दर्शवली जात नसल्याने स्थानिक उमेदवारांवर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सध्या पवित्र संकेतस्थळावर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळाचा सर्व्हर वारंवार ठप्प होत असल्यामुळे उमेदवारांना पसंतीक्रम भरताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १ वी पर्यंतच्या शाळांमधील अनेक उपलब्ध जागा संकेतस्थळावर दिसतच नसून, ९ वी ते ११ वी साठी दर्शवण्यात आलेल्या पदांची संख्याही अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम भरण्यासाठी तातडीने मुदतवाढ देण्यात यावी, संगणकीय यंत्रणेतील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि जिल्ह्यातील ६ वी ते ११ वीच्या सर्व रिक्त जागांची योग्य शहानिशा करून त्या संकेतस्थळावर तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक पात्र उमेदवारांना त्यांच्याच जिल्ह्यात हक्काच्या संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिक त्रुटी आणि गायब झालेल्या जागांमुळे गुणवंत उमेदवार या भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांवर मोठा अन्याय होईल, असा इशारा उमेदवारांनी दिला आहे. हे निवेदन सादर करतेवेळी दिप्ती रविंद्र सावंत, सुरभी सुशांत नलावडे, निरजा संतोष नागवेकर, समिक्षा तुळशीदास भाईडकर, पांडुरंग विजय मिशाळ आणि विठू गोपाळ गुरव यांच्यासह इतर बी.एड. व टी. इ. टी. उत्तीर्ण उमेदवार उपस्थित होते.