दोडामार्ग येथील वन कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित

दोडामार्ग येथील वन कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित

सिंधुदुर्ग


     दोडामार्ग तालुक्यातील वन्य हत्ती व इतर वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती आणि फळबागांच्या नुकसानभरपाई संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण अखेर वनविभागाच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले आहे.बांबर्डे (ता. दोडामार्ग) येथील शेतकरी दौलतराव दत्ताराम राणे, मदन शिवराम राणे व  सिद्धेश सूर्याजी राणे यांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2026 पासून हे उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर, सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) आणि दोडामार्गचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रलंबित प्रस्ताव प्रचलित नियमांनुसारच मंजूर केले जातील, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच क्षेत्राच्या मर्यादेपेक्षा अधिकच्या लागवडीकरिता नियमापेक्षा जास्त नुकसानभरपाई देय असणार नाही, याबाबतही उपोषणकर्त्यांना अवगत करण्यात आले. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी वनविभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.