विमान प्रवास महागणार! इराण-इस्रायल युद्धाचा फटका; इंडिगोने लागू केले 'इंधन शुल्क'
नवी दिल्ली
मिडल इस्टमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचे चटके आता थेट सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणार आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आपल्या विमान तिकिटांवर 'इंधन शुल्क' लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोने घेतलेल्या या निर्णयामुळे आज, १४ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासाच्या अंतरावरून प्रवाशांना आता ४२५ रुपयांपासून ते २,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चापैकी सुमारे ४०% खर्च हा केवळ विमानाचे इंधन म्हणजेच 'एव्हिएशन टर्बाइन इंधनवर होतो. मध्य पूर्वेतील युद्धामुळे जेट इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी इंडिगोने हे पाऊल उचलले आहे.इंधनाच्या किमतीतील वाढीचा पूर्ण भार प्रवाशांवर टाकला असता, तर तिकीट दरात मोठी वाढ झाली असती. मात्र, प्रवाशांचे हित लक्षात घेऊन सध्या केवळ अंशतः भरपाई म्हणून हे माफक शुल्क लागू करण्यात आले आहे," असे स्पष्टीकरण इंडिगोने निवेदनात दिले आहे. केवळ इंडिगोच नाही, तर इतर विमान कंपन्यांनीही दरवाढीचे संकेत दिले आहेत. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांनी १० मार्च रोजीच फ्यूल सरचार्ज जाहीर केला आहे. कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहिल्यास स्पाइसजेट आणि आकासा एअर यांसारख्या कंपन्याही लवकरच भाडेवाढ करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

konkansamwad 
