खर्डेकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘भारतीय नागरीकांची कर्तव्ये’ विषयावर व्याख्यान संपन्न.
वेंगुर्ला.
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय नागरीकांची कर्तव्ये या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ एम.बी.चौगले होते तर प्रमुख वक्ते म्हणून रावसाहेब गोगटे कॉमर्स कॉलेज आणि श्रीमती सरस्वतीबाई घनशेट वाळये आर्टस कॉलेज, बांदा चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ किशोर म्हेत्री होते.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ किशोर म्हेत्री यांनी भारतीय घटनेत भारतीय नागरीकांना जसे अधिकार दिले त्याचप्रमाणे त्यांनी काही कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असते. नागरीकामध्ये कर्तव्य विषयक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. असे सांगून नागरीकांच्या कर्तव्यांचा उहापोह केला.संविधानाचे व त्याच्या आदर्शाचे पालन करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेंव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृध्द वारशाचे मोल जाणून तो जतन करणे अशा अनेक कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्यावेळी आपण हक्कासाठी लढतो त्यावेळी आपली कर्तव्ये पार पाडणे गरजेचे असते असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.वामन गावडे यांनी व्यक्त केले.