गॅसचा तुटवडा संपणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता थेट व्हॉट्सअॅपवर नोंदवता येणार तक्रार
मुंबई
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात गॅस आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला मोठा दिलासा देत, गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, गॅस पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तक्रारी निवारण्यासाठी आता व्हॉट्सअॅप सुविधा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्याने भारतात इंधन टंचाई भासणार, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी स्पष्ट केले की राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडरसाठी रांगा लावू नयेत किंवा साठेबाजी करू नये. पेट्रोल आणि डिझेलचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या गॅस पुरवठ्यावर देखरेख ठेवतील. रुग्णालये, शाळा आणि आश्रमशाळांसारख्या अत्यावश्यक सेवांना विनाव्यत्यय गॅस पुरवठा केला जाईल. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा गॅस न मिळण्याच्या तक्रारींसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर व्हॉट्सअॅप सुविधा आणि नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता निश्चिंत राहावे.

konkansamwad 
