वेंगुर्ला खर्डेकर महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून विशेष सन्मान

वेंगुर्ला
वेंगुर्लेतील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन करत मुंबई विद्यापीठाचा "सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय" २०२४-२५ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी व संस्था प्रतिनिधि सुरेंद्र चव्हाण आणि सहकारी प्राध्यापक यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सन्मान करून गौरव केला.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हे खरोखरच प्रशंसनीय आहे. खर्डेकर महाविद्यालयाने शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उपक्रमांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. या महाविद्यालयाचा ‘सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कार हा केवळ वेंगुर्ल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.", अलीकडेच मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे खर्डेकर महाविद्यालय या पुरस्कारासाठी पात्र ठरले. या निमित्ताने प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की "हा पुरस्कार आमच्या संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराचा आहे. शिक्षकवृंद, विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक यांच्या एकत्रित परिश्रमांचे हे यश आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. ‘सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय’ हा सन्मान आमच्या कार्याला नवे बळ देणारा आहे आणि भविष्यात आणखी उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे." या अभूतपूर्व कामगिरीमुळे वेंगुर्ला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा अभिमानाने उंचावला असून खर्डेकर महाविद्यालयाचा हा सन्मान ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.