गोवा बनावटीची दारू वाहतुकी प्रकरणी कोल्हापूर येथील दोघे ताब्यात.......सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५७ हजारच्या दारूसह कार जप्त करण्यात आली आहे. महेश आप्पा पाटील (वय ३५) व रोहन मानसिंग केंगारे (वय ३१, रा. हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे. ही कारवाई सावंतवाडी पोलीसांकडून माजगाव-गरड येथे करण्यात आली. बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी माजगाव येथील गरड भागात सापळा रचला. तपासणीदरम्यान संशयित वाहन अडवून तपासले असता गाडीच्या सीट कव्हरखाली विशेष कप्पे तयार करून त्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवल्याचे आढळले. पोलिसांनी या गाडीतून ५७ हजार ६०० रुपये किंमतीच्या एकूण १४४ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेले ९ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत महेश पाटील व रोहन केंगारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

konkansamwad 
