चिंदर बाजारवाडी येथील विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना वनविभागाकडून जीवदान.

चिंदर बाजारवाडी येथील विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना वनविभागाकडून जीवदान.

मालवण.

  चिंदर बाजारवाडी येथील महेंद्र मांजरेकर यांच्या विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना वन विभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढत वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडत जीवदान दिले.
   चिंदर बाजारवाडी येथील महेंद्र मांजरेकर यांच्या विहिरीत दोन कोल्हे पडल्याची स्थानिकांना दिसून आले. याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक, सुनील लाड, कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील दिनेश पाताडे यांच्या समवेत वनपाल श्रीकृष्ण परीट, धामापूरचे वनरक्षक शरद कांबळे, वनसेवक अनिल परब, राहुल मयेकर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन विक्रांत आचरेकर, धनंजय कांबळी, ओंकार वळंजू, राजू पडवळ, मुन्ना पडवळ या सर्व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही कोल्ह्यांना सुखरूप रेस्क्यू करून बाहेर काढले. पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
   कोल्हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ ने त्याला संरक्षित करण्यात आले आहे. याप्रकारे वन्यजीव विहिरीत पडल्याची घटना घडल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन परिमंडळ वनाधिकारी श्रीकृष्ण परीट यांनी केले आहे.