मुंबई विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर......संत राऊळ महाराज महाविद्यालयाला यंदा दुहेरी सन्मान

कुडाळ
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ या महाविद्यालयाला यंदा दुहेरी सन्मान लाभला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांना मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संगम कदम यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याची गौरवपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करते. यावर्षी या मानाच्या पुरस्कारांसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाची निवड झाल्याने महाविद्यालयीन परिवारात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. स्मिता सुरवसे यांनी शिक्षणक्षेत्रातील दीर्घकालीन सेवेतून अध्यापन, संशोधन, सामाजिक भान आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक व नेतृत्व गुणांची दखल घेत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.संगम कदम यांनी गेली अनेक वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्तीच्या बळावर शिक्षकेतर सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्य कुशलतेमुळे महाविद्यालयीन प्रशासन सुसूत्र व कार्यक्षम राहिले आहे. त्यामुळेच त्यांना हा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाला आहे.या दुहेरी सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी अभिमान व्यक्त केला असून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे आणि संगम कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.