गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुजरात येथील दोघे ताब्यात
बांदा
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १३ लाख ४१ हजाराच्या दारूसह, बॅरल व टेम्पो असा एकूण २३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनेशभाई नवलसिंग संघाडा (वय २५) व रोहित अशोकभाई यादव (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून आज सकाळी करण्यात आली.
गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती इन्सुली पथकाला मिळाली होती. त्यामुळे सोमवार सकाळपासूनच पथकाने सापळा रचला होता. गोव्याहून बांदा पोलिसांचा तपासणी नाका पार करून सिंधुदुर्गच्या दिशेने येणारा ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला. यावेळी ट्रकमधील बॅरलमध्ये केमिकल पावडरच्या आड लपून ठेवलेले गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स निदर्शनास आले. यात एकूण २१५ बॉक्समध्ये १० हजार ३२० दारूच्या बाटल्या आढळून आल्यात. बाजारभावाप्रमाणे दारूची किंमत १३ लाख ४१ हजार ६०० रुपये तसेच बॅरल व ट्रक असा एकूण २३ लाख ७३ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान दीपक वायदंडे, रणजीत शिंदे, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.

konkansamwad 
