मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू जप्त

मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू जप्त

 

कणकवली

 

       मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे गोवा बनावटीची दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. यात ताब्यात घेण्यात आलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोमधून ७ लाख २० हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला आहे.
   जिल्ह्यात सध्या नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांचा कालावधी सुरू असून त्या अनुषंगानेच एक्साईज विभागातर्फे सध्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई सत्र राबविण्यात येत आहे. महामार्गावरून गोवा बनावटीची चोरटी दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती एक्साइजच्या पथकाला मिळाली.
        त्यानुसार पथकाने महामार्गावरील वागदे हे ठिकाण गाठले. या मार्गाने जात असलेल्या GJ 13 AX 9300 या क्रमांकाचा बोलेरो पिकअप टेम्पो पथकाने थांबविला. टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनवटीच्या दारूने भरलेले बॉक्स आढळून आले. कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार, अधीक्षक श्रीम. किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकुर, जवान अजित गावडे, तुषार ठेंबे वाहनचालक हेमंत वस्त सहभागी झाले होते. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.