सिंधुदुर्ग विद्यानिकेतनमध्ये बाल दिन उत्साहात साजरा
वेंगुर्ला
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून बालदिन साजरा केला जातो.पंडित नेहरू मुलांना खूप प्रेम करायचे आणि त्यांच्या शिक्षण व कल्याणासाठी खूप प्रयत्नशील असायचे.आजची मुले हे उद्याच्या देशाचे भविष्य ही त्यांची धारणा होती. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात 'बालदिन' म्हणून साजरा करण्यात येतो.दिनांक 14 नोव्हेंबर या दिवशी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला येथे बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिद्धिविनायक मंगल कार्यालय,भटवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांचे स्वागत शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी मिहीर राऊळ याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर डिसोजा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिक्षकवृंद, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच पालक संघाचे अध्यक्ष सुजित चमणकर व महिला पालक प्रतिनिधी म्हणून प्रीती शिंदे यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
'बालदिन' म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी आयोजित केलेला हा एक सोहळाच होता.शाळेच्या सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शालेय गणवेश परिधान करून सादर केलेले सुंदर नृत्य विशेष ठरले. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात शाळेच्या पहिल्या दिवसापासून अगदी सहजपणे त्यांच्या नकळत कोणकोणत्या कृती करत असतात याचे सुंदर दर्शन शिक्षकांनी आपल्या नाटकातून सादर केले.
वेशभूषा, बालकविता, बालगीत तसेच एक सुंदर समूह नृत्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले. तसेच शिक्षकांनी समुहगीतातून विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. 'प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य' हे एक ब्रीदवाक्यच शाळेच्या या कार्यक्रमाचे होते. त्यातूनच या संपूर्ण सोहळ्याची मांडणी केली होती. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या शिक्षकांनीही आपल्या मराठी व इंग्रजी भाषणातून विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या तर विविध कवितांच्या माध्यमातून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बाल दिनानिमित्त शाळेतर्फे विद्यार्थी व पालक संघासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.तर पालक संघातर्फे विद्यार्थ्यांना केक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाळेच्या शिक्षिका प्रियांका मिसाळ, समिधा तेंडोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक नितीन कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्री-प्रायमरी ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.

konkansamwad 
