आरवली रॉयल एनफिल्ड बुलेट चोरी प्रकरण.....चोरट्यास वेंगुर्ला पोलिसांकडून अटक
वेंगुर्ला
आरवली देऊळवाडी येथून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट चोरटा चंदन सुहास परुळेकर (वय २५) राहणार मठ- वेंगुर्ले यांस वेंगुर्ले पोलीस पथकाने रेडी हुडावाडी तिठ्यावर ताब्यात घेतले. या संशयिताने पोलीसांकडे कबुली दिली. वेंगुर्ले न्यायालयात त्यास हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.आरवली देऊळवाडी येथील इलेक्ट्रिक सामान असलेल्या गोडाऊन जवळ आरवलीचे उपसरपंच किरण जनार्दन पालयेकर यांनी हँडल लॉक करून ठेवलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट हि चोरीस गेली होती. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आतच सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम, स्वप्नील तांबे व योगेश राऊळ यांच्या पथकाने रेडी हुडावाडी येथे आरोपी चंदन परुळेकर यास ताब्यात घेतले. आरोपीने चोरून नेलेली बुलेट गाडी ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयाकडे आरोपीस हजर करताना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे एक दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम करत आहेत.

konkansamwad 
