कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता; रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.
पुणे.
राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे विदर्भातील नागपुरात पुरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आज देखील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, ओडीसा ते उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत असलेले डिप्रेशन आज ओरिसाच्या किनारपट्टीच्या चिनका सरोवराजवळ स्थिरावले आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात उत्तर केरळ किनारपट्टी लगत असलेला कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. आज दिनांक २१ जुलै व उद्या कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात आज बहुतांश तर उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व या जिल्ह्यांमध्ये काही भागात अति जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार वादळी पावसाची दाट शक्यता आहे.
तर सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात २३ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रविवारी ठाणे, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशीव, बीड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोदींया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.