निलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन.......रवींद्र चव्हाण म्हणाले, 'दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे'

निलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन.......रवींद्र चव्हाण म्हणाले, 'दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे'

 

मुंबई

 

        आमदार निलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून मालवणमधील एका भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही  जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी अचानक धाड टाकल्याची घटना राज्यभर चांगलीच गाजत आहे. या कारवाईदरम्यान घरातून नोटांनी भरलेली एक बॅग मिळाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी राणे यांनी सोशल मीडियावरून थेट प्रसारण करत तपशीलवार घटनाक्रम सांगितला आहे. ज्या माध्यमातून त्यांनी भाजपवर आरोपांची सरबत्ती केली आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आयोजित केल्या जाणाऱ्या सभा तसेच मेळाव्यांवर उमटताना दिसत आहेत.
     दरम्यान, भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की, ज्यांच्या घरात पैसे आढळले ते पैसे नेमके कुठून आले आणि कोणत्या व्यवहाराशी संबंधित आहेत, याची चौकशी पोलीस करतील. त्यामुळे लगेचच भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले, असा निष्कर्ष काढण योग्य नाही. पैसे असण ही वेगळी गोष्ट आहे; पण एखाद्याच्या घरात, त्यातही बेडरूमपर्यंत शिरून स्टिंग ऑपरेशन करण चुकीच आहे.
   कोणालाही अशा पद्धतीने एखाद्याच्या घरात जाण्याचा किंवा बेडरूमपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. निलेश राणेंनी काय कराव हा त्यांचा विषय आहे. पण एखाद्याच्या बेडरूमपर्यंत जाऊन चित्रीकरण करण हे नियमबाह्य आहे, अस मला वाटत. तरी देखील, राणे यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या निदर्शनास जे मुद्दे आणून दिले आहेत, त्यानुसार निवडणूक आयोग आणि पोलीस आवश्यक ती कारवाई करतील, अशी आपणास अपेक्षा असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.दुसरीकडे, नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे निर्माण झालेल्या वादाच्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाच्या मुद्द्द्यावर छेडल्यानंतर, दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. त्यानंतर मी बोलेन. ते खोटे बोलत आहेत, एवढेच ते म्हणाले.