राज्यातील सर्व शाळांचे ‘जिओ टॅगिंग’ होणार....नव्या ॲपद्वारे शाळेची माहिती मिळणार

राज्यातील सर्व शाळांचे ‘जिओ टॅगिंग’ होणार....नव्या ॲपद्वारे शाळेची माहिती मिळणार

 

मुंबई 


    आगामी काळात ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार, आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी मोबाईल ॲप महा स्कूल जीआयएस) विकसित केले आहे.या ॲपमध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे GIS Location  Capture करुन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करुन संबधित शाळेने माहिती भरावयाची आहे.सदर ॲपवर ही माहिती भरताना संबंधीत मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो/माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच सदर माहिती संबंधीत ॲपवर दि. ३० एप्रिल २०२५ पुर्वी अद्ययावत करण्यात यावी व सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधीत शिक्षणाधिकारी यांनी करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.दरम्यान, राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDISE plus या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इ. माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण/कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि, धोरणांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता अन्य माहिती जसे गाव, वाड्या, वस्ती यांचे ठिकाण (Location), लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग/महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजिक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नव्हती. ही कमतरता भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेसोबत करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDISE plus या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती यांचे एकत्रिकरण करुन सदर माहिती एका स्वतंत्र Dash Board वर उपलब्ध करण्यात येणार आहे.