मालवण पालिकेच्या आडून आमदार नीलेश राणे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न.....उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आरोप

मालवण पालिकेच्या आडून आमदार नीलेश राणे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न.....उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आरोप

 

मालवण
 

        मालवण येथील पालिकेच्या निवडणुकीच्या आडून काही जण आमदार नीलेश राणे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्योगमंत्री तथा शिंदे शिवसेना जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित जाहीर सभेत केला. मात्र कोणीही कितीही प्रयत्न केला तरी मालवणची निवडणूक आणि मतदार नीलेश राणेंच्या आणि शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
       निवडणुका येतील जातील. पण एकमेकांचे संबंध टिकले पाहिजे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यामुळे सिंधुदुर्गात युती झाली नाही याचे सर्वात जास्त दुःख खासदार नारायण राणे यांना झाले आहे. त्यांची युती होण्याची इच्छा होती. यामुळे आम्ही त्यांना त्रास होईल अशी भूमीका कधी घेतली नाही. भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यात आल्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल केली आहे. आमच दुदैव आहे की सिंधुदुर्गात युती न होता आम्ही लढत आहोत, अशीही खंत उदय सामंत यांनी व्यक्त केली. मालवणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये येतील असेही यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.
        मालवण येथील शिंदे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात जाहीर सभा झाली. व्यासपीठावर आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, उमेश नेरूरकर, महेश कांदळगावकर, संजय पडते, रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख राजेश मोरे, काका कुडाळकर, आनंद शिरवलकर, मधुरा तुळसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आपले विचार मांडताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिका करत नगराध्यक्षसह २० नगरसेवक शिंदे शिवसेनेचे विजयी करणार असल्याचा दावा केला. यावेळी शहरातील युवा कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उद्योगमंत्री सामंत यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
          श्री. सामंत म्हणाले, एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ती ओबीसीचे जातप्रमाणपत्र घेते यात तीच्याकडून मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक केली जात आहे. याची नोंद मालवणवासियांनी घ्यायला हवी. निवडणूक लढवायची असेल तर ताठ मानेने लढायला हवी. मात्र यात आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो ती जातच बदलायची म्हणजे दोन जातीचा अपमान केल्याची संपूर्ण महाराष्ट्रात पहिली घटना घडली आहे, अशीही टिका श्री. सामंत यांनी केली.
        आमदार नीलेश राणे यांची भाषणे मी नेहमी एकत असतो. मला आता त्यांचा हेवा वाटत आहे. त्यांचे कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारातील भाषण हे जबरदस्त होते. त्यामध्ये त्यांनी खासदार नारायण राणे यांना त्रास होईल असे एकही विधान केले नाही. त्यांच्यातील राजकीय परिपक्वता दिसून आली आहे. ते आता थेट डायरेक्ट हिट करत नाहीत. त्यांना सिंधुदुर्गातील क्रिकेटर माहिती आहेत. यामुळे ते खेळवून खेळवून नंतरच षटकार मारत आहेत. यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे, असेही श्री. सामंत म्हणाले,
भाजप बरोबर नैसर्गिक युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. मात्र नीलेश राणेंचा धसका काही लोकांनी घेतला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. खासदार नारायण राणेंनंतर सिंधुदुर्ग चालविण्याची ताकद फक्त नीलेश राणे यांच्यामध्येच आहे. यामुळे काही लोकांनी धसका घेतला आहे. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सिंधुदुर्गात नीलेश राणेंचा प्रवेश झाल्यानंतर ज्या जोमाने शिवसेना वाढली आहे. संपूर्ण जिल्हा शिवसेनामय झाला आहे, त्याचे सर्व श्रेय नीलेश राणेंनाच जाते. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास लक्ष राणे यांच्याकडे आहे. यामुळे आमदारांची ताकद वाढविण्यासाठी शहरवासियांनी पालिकेवर एकहाती सत्ता शिवसेनेची आणली पाहिजे. पालिकेच्या सर्वांगिण विकासाचा शब्द मी देत आहे, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले
मालवण पालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उभ्या असलेल्या उमेदवाराचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप आमदार नीलेश राणे हे करत असून याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती आणि पुरावे पत्रकारांसमोर सादर करणार आहे. आम्हाला या गोष्टींमध्ये जायचे नव्हते, मात्र आमच्या उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेत तब्बल अडीच तास सुनावणी घेण्यात आली होती. यामुळे आम्ही आता भाजपच्या उमेदवाराच्या जातप्रमाणपत्राची सविस्तर माहिती घेतली आहे आणि जनतेसमोर ती मांडणार आहे, असेही श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.
         युती तुटल्याबाबत अन्य काही बाबी आहेत. त्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मांडणार आहे. मात्र शिवसेना-भाजप ही नैसर्गिक असलेली युती कायम रहावी हाच माझा प्रामाणिक हेतू आहे. हा वणवा या ठिकाणी पेटलेला असून तो याचठिकाणी विझावा म्हणून मी सगळ अंगावर घेत आहे. यातून मलाही वेदना होत आहेत. भाजपही आपलेच कुटुंब आहे. मात्र जाणीवपुर्वक कोणी काही करत आहेत, त्याला वेळीच थांबविण्यासाठी आपण लढत आहे. मालवणच्या मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. या ठिकाणी शहरविकासाचे व्हीजन घेऊन आम्ही चाललो आहोत. जनतेचा सर्वांगिण विकास करण्याचे स्वप्न आमच्यामध्ये असून ते पूर्ण करण्याची धमकही आहे, असेही श्री. राणे यांनी सांगितले.
           आता जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला आमदार नीलेश राणेंच्या मिनीटा मिनीटाच्या दौऱ्याची माहिती हवी आहे. सत्ता असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकत नाही. मला रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नका. मला ज्या ठिकाणी पोहचायचे आहे त्या ठिकाणी मी पोहचणारच आहे. मी कधी खोट करत नाही आणि सहनही करणार नाही. या राज्यात ३५० पेक्षा जास्त किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. मोघलांचे नव्हते, मोघल किती होते, त्यांच्याकडे सर्व काही होते पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे जिगर होता. मोघल आले निजाम आले तरीही महाराज कधी डगमगले नाही. कोणी नको त्या विषयात जाऊ नका. भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यात सर्वत्र निवडणुका असताना पुन्हा सिंधुदुर्गात येत आहेत आणि त्यातल्या त्यात पुन्हा मालवणमध्ये येत आहेत. एवढे करूनही आम्ही मालवणमध्ये जिंकलो तर लपायलाही जागा मिळणार नाही. लोक विचारणार आहेत, याचातरी विचार करा असा टोला श्री. राणे यांनी यावेळी लगावला.