चिपळूण रेल्वे स्थानक आता आकर्षक स्वरूपात मिळणार पहायला; रेल्वे परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती.
रत्नागिरी.
कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानक आता लवकरच आकर्षक स्वरूपात पहायला मिळणार आहे. सुमारे ५ कोटी रुपयांतून रेल्वे परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाने गती घेतली आहे. रस्ता, शेडसह आवश्यक सोई सुविधाही उपलब्ध केल्या जाणार असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोयसुद्धा दूर होणार आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमध्ये सोई-सुविधांचा अभाव जाणवत होता. यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे रस्ता ते रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवाशांमधून या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. तर दुसरी रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्किंग शेडची व्यवस्था नव्हती, तसेच प्रवाशांची गर्दी झाल्यास अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पाऊस, उन्हात उभे राहायचे म्हटले तर कोणतीही सोयीसुविधा नाही. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूणसह खेड रेल्वे स्थानक, परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.