कणकवली येथे घरफोडी

कणकवली येथे घरफोडी

 

कणकवली

 

     कणकवलीतील गडनदी पुलानजीक असलेल्या साईपार्क अपार्टमेंटमध्ये होळी सणाच्या दिवशीच घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
       वागदे येथील साईपार्क अपार्टमेंटमधील रहिवासी सचिन विलास वंजारी (व्यवसाय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक) हे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होळी सणानिमित्त कुटुंबासह आपल्या मूळ गावी सावंतवाडी येथे गेले होते. दरम्यान २ मार्च रोजी सायंकाळी ७.१५ वाजता त्यांच्या शेजारी राहणारे अॅड. नितीन म्हापणकर यांनी वंजारी यांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या फ्लॅटचा दर्शनी दरवाजा उघडा असून कडी तुटलेली दिसत असल्याची माहिती दिली. ही बाब कळताच सचिन वंजारी हे तत्काळ पत्नीसह सावंतवाडीहून वागदे येथील आपल्या फ्लॅटवर दाखल झाले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले असता फ्लॅटमधील लोखंडी कपाट फोडण्यात आले होते. चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात १७ ग्रॅम वजनाचे कानातील दागिने (चैनीसह कुडी जोड), २२ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, १५ ग्रॅम वजनाची चेन असे एकूण सुमारे ५ तोळे ४० ग्रॅम वजनाचे अंदाजे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने तसेच रोख २५ हजार रुपयांचा समावेश आहे. या प्रकरणी सचिन वंजारी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात बीएनएस कलम ३३१ (३), ३३१ (४) व ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाहणी केली असून तपास सुरू केला आहे. तसेच एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ व सहकारी अमलदार तपास करत आहेत. फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे.