वेंगुर्ल्यात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस जल्लोष....मॅरेथॉन, कांदळवन स्वच्छता आणि ‘सलमान अली नाईट’चे आकर्षण

वेंगुर्ल्यात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस जल्लोष....मॅरेथॉन, कांदळवन स्वच्छता आणि ‘सलमान अली नाईट’चे आकर्षण
वेंगुर्ल्यात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस जल्लोष....मॅरेथॉन, कांदळवन स्वच्छता आणि ‘सलमान अली नाईट’चे आकर्षण

 

वेंगुर्ले

 

    कुडाळ–मालवणचे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे १५ ते १७ मार्च दरम्यान विविध सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. स्वरैया फाउंडेशनच्यावतीने आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा, कांदळवन स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर तसेच भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत स्वरैया फाउंडेशनचे सचिव धनंजय महाजन यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, प्रदीप वेंगुर्लेकर, राजू वजराटकर, राकेश सापळे, पंकज शिरसाट, तुषार भोसले आदी उपस्थित होते.

सिंधुरन मॅरेथॉनचे आयोजन

रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ला कॅम्प येथून “सिंधुरन मॅरेथॉन” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या धावपटू दुती चंद यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध अभिनेते बिंदू दारासिंग यांचीही उपस्थिती राहणार आहे.स्पर्धेत ३ कि.मी. फन रन तसेच ५ कि.मी. आणि १० कि.मी. टाईम रन असे प्रकार असतील. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागी धावकांना टी-शर्ट, पदक, प्रमाणपत्र, नाश्ता तसेच हायड्रेशन बुथची सुविधा उपलब्ध असेल. प्रथम ३०० नोंदणीधारकांना टी-शर्ट व पदक देण्यात येणार आहेत.


‘सलमान अली म्युझिकल नाईट’ ठरणार खास आकर्षण
१५ मार्च रोजी रात्री ८ वाजता वेंगुर्ला कॅम्प मैदानावर इंडियन आयडल विजेता सलमान अली यांची भव्य म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री डेझी शाह यांची उपस्थिती तसेच नृत्यांगना सोनाली राऊत व इशा शाह यांचे नृत्य सादरीकरण होणार असून हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

कांदळवन स्वच्छता मोहीम

१६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता वेंगुर्ले येथील कांदळवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वरैया फाउंडेशन, नगरपरिषद वेंगुर्ला, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फॅटरनिटी क्लब तसेच जिल्हा शिवसेना यांच्या सहभागाने हा उपक्रम होणार आहे.

भव्य आरोग्य शिबिर

१७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले गाडीअड्डा येथील डॉ. उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ वेंगुर्लेवासीयांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन स्वरैया फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.