दशावतार कलाकार यश जळवी यांना प्रतिष्ठेचा 'यू इन्स्पायर पुरस्कार' प्रदान
मुंबई
कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा "यू इन्स्पायर पुरस्कार" प्रदान करण्यात आला. कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी यश जळवी यांना मिळाल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
आजच्या काळात दशावतारात स्त्री पात्रे साकारणारे कलाकार फारच कमी झाले असताना, या परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या यश जळवी यांच्या कामगिरीचा हा सन्मान असल्याचे दयानंद कुबल यांनी गौरवोद्गारात सांगितले. दशावतार कलेवर आधारित "दशावतार" या मराठी चित्रपटातही यश यांनी आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता.
हा सन्मान म्हणजे माझ्या कलागुणांचा नव्हे, तर दशावतार या प्राचीन कलेचा सन्मान आहे. कोकण संस्थेने दिलेले हे प्रोत्साहन मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल, असे प्रतिपादन श्री. जळवी यांनी केले. यावेळी. पद्मश्री मुरलीकांत पेटकर, अभिनेते अविनाश नारकर, लेखक दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, वाशिष्ठी दूध प्रॉडक्ट्सचे संचालक प्रशांत यादव, सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र आढाव, कन्टेन्ट क्रिएटर साहिल दळवी, सार्थक सावंत तसेच विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

konkansamwad 
