आखाती देशांत अडकलेल्या सिंधुदुर्गातील नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज....११७ जणांकडून आपण सुरक्षित असल्याचा दावा...
सिंधुदुर्गनगरी
नोकरी आणि व्यवसायानिमित्त आखाती देशांमध्ये गेलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिक सध्या तिथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आज ५ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण १३७ नागरिकांच्या नोंदी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाकडून आता तातडीने पावले उचलली जात आहेत. या एकूण १३७ नागरिकांपैकी २० जण असे आहेत ज्यांना तातडीने भारतात आपल्या घरी परतायचे आहे. या २० व्यक्तींना सध्या तिथे तातडीच्या मदतीची आवश्यकता असून, त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष लिंकवर त्यांची संपूर्ण माहिती भरण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ नागरिक दुबईतील आहेत, तर कुवेतमध्ये ४, कतारमध्ये २ आणि बहारीन, सौदी अरेबिया व अबू धाबी येथे प्रत्येकी एक नागरिक अडकलेला आहे.या सर्वांशी संपर्क साधण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
ही लिंक त्यांच्यासोबत शेअर करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त, सिंधुदुर्गातील इतर ११७ नागरिकही आखाती देशांमध्ये वास्तव्यास असून त्यांच्याही नोंदी प्रशासनाकडे प्राप्त आहेत. यामध्ये दुबईत ६१, सौदीमध्ये ११, शारजामध्ये १०, कुवेतमध्ये ८ आणि इतर काही शहरांत राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. या ११७ जणांनी आपण सुरक्षित असून सध्या तरी आपल्याला कोणत्याही तातडीच्या मदतीची गरज नसल्याचा दावा केला आहे. असे असले तरी, जिल्हा प्रशासनाकडून या सर्व १३७ सिंधुदुर्गवासीयांच्या परिस्थितीवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

konkansamwad 
