बसचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी : निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.
सिंधुदुर्ग.
बसेसच्या अपघातांमध्ये होणारी मोठ्या प्रमाणातील जिवितहानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या बसचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक के. एल. सावंत, राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी व्ही.व्ही. जोशी, सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग उप कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग सावंतवाडी आर.पी. कांबळे, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग खारेपाटण ए.एस. शिमीवाळ, सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, महामार्ग पोलीसचे व्ही. बी. केसरकर, सहायक पोलीस निरीक्षक भारत फारने, जिल्हा रुग्णालयतील डॉ. अमित आवळे आदी उपस्थित होते.
श्री. सुकटे म्हणाले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दि. 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तरी शासकीय कार्यालयातील वाहनचालक व कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांनी तपासणी करुन घ्यावी. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी यांच्या सेवाभावी संस्थेचे सहकार्यातून दिनांक 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तर ग्लोबल फाऊंडेशन, कुडाळ मार्फत राज्य परिवहन विभाग देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोतील वाहनचालक व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यांचा लाभ वाहनचालकांनी घ्यावा,असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे म्हणाले, जिल्हा नियोजन निधीतून एकूण आकारमानाच्या किमान 1 टक्का निधी हा रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी देण्यात यावा. सदर निधी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी दिलेल्या सूचना या साठी खर्च केला जाणार. दिनांक 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये वाहनचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शाळामधील खासगी वाहनचालकास सहभागी होण्यासाठी शाळांना कळविण्यात येणार आहे.