शिरोडा येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. अखेर शिरोडा ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली.

शिरोडा येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.  अखेर शिरोडा ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली.

वेंगुर्ला.

  आज शिरोडा येथील ग्रामदैवत श्री.माऊलीचा जत्रोत्सव असल्याने आज गोवा व सिंधुदुर्गातील भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती.अशातच आज शिरोडा आठवडी बाजार असल्याने शिरोडा येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान सातार्डा सटेली ते शिरोडा मार्गे रेडी बंदर या मार्गावर मायनिंग वाहतूक करणारे डंपर आज येथील शिरोडा ग्रामस्थांनी रोखले.यामध्ये जवळ जवळ ३००-४०० डंपरांचा समावेश होता.
       या मार्गावरून मयानिंग वाहतूक करणाऱ्या डंपरची नेहमी वाहतूक चालू असते.तसेच हे डंपर चालक या रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर हाकत असल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याने आज येथील ग्रामस्थांनी मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखून धरले.यावेळी डंपर चालक व मायनिंगचे व्यवस्थापक यांच्याशी ग्रामस्थांची बाचाबाची झाल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
   पोलीस प्रशासन व परिवहन विभाग यांच्याकडून डंपर चालकांना अभय दिल्याने डंपर चालकांची मुजोरी वाढली असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.तसेच आज शिरोडा गावाची जत्रा असल्याने येथील पोलीस ठाण्यातून वाहतुकीसाठी वाहतूक पोलीस नियुक्त न केल्याने व वाहतूक कोंडीवर कोणतेही नियोजन न केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
   यावेळी मयुरेश शिरोडकर, अमित गावडे,राहुल गावडे, लक्ष्मीकांत करपे, संदीप धानाजी, संतोष अन्सुरकर, प्रजेशं गावडे, बबन गावडे,आबा राऊत, दादा गावडे, रुपेश परब, बाबू शेट्ये, उल्हास गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.