गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई ; एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त.
सावंतवाडी.
बांदा पोलीसांनी आज पहाटे चेकपोस्टवर गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली.या कारवाईत २६ लाख २० हजार ८०० रुपयांच्या दारुसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी बाबासाहेब बबन यादव (४१, रा. सर्जेपूर, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा पोलीस चेकपोस्टवर मुंबईकडे जाणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोच्या दर्शनी भागासह मागील बाजूसही नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलीसांना संशय आला. टेम्पोत स्क्रॅप असल्याचे चालकाने सांगितले. मात्र अधिक तपासणी केली असता त्यात दारुचे बॉक्स आढळून आले.टेम्पोत रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की ब्रँडचे तब्बल ९१० बॉक्स आढळले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २६ लाख २० हजार ८०० रुपये आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे १० लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सुनील पडवळ, हेड कॉस्टेबल सिताकांत नाईक, कॉस्टेबल राकेश चव्हाण, राजेंद्र बर्गे यांच्या पथकाने केली.