सिंधुदुर्ग किल्ल्यावर मायनाक भंडारी यांना मानाचे स्थान मिळावे; सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर मायनाक भंडारी यांना मानाचे स्थान मिळावे; सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव.

वेंगुर्ला.

     सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे पहिले आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांना मानाचे स्थान मिळावे , यासाठी सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन मायनाक भंडारी यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनानेही याची दखल घ्यावी यासाठी सर्व समाज बांधवानी जोरदार संघर्ष करावा व 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनी मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमात भंडारी समाजाच्या बांधवाना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आज झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
     सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची तातडीची सभा आज गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 4 डिसेंबर रोजी मालवण किल्ल्यावर नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांस छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख मायनाक भंडारी यांच्या कर्तृत्वाला न्याय मिळण्यासाठी व त्या विशेष कार्यक्रमात त्यांना महाराजांसमोर मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही, तसेच शासनाने ओबीसींची जनगणना करावी, असा प्रस्ताव रमण वायंगणकर यांनी मांडला त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन मायनाक भंडारी यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनानेही याची दखल घ्यावी यासाठी सर्व समाज बांधवानी जोरदार संघर्ष करावा व नौसेना दिनी होणाऱ्या कार्यक्रमात भंडारी समाजाच्या बांधवाना व्यासपीठ मिळवून द्यावे , असे विचार ज्येष्ठ समाज बांधव मामा माडये यांनी मांडले व त्यासही सर्वानुमते मान्यता देण्यात आली. 'चला कलाकार घडवूया' च्या माध्यमातून 19 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे कार्यशाळा भरविण्यात येणार आहे, त्याबाबत सांस्कृतिक विभाग प्रमुख गणेश तळेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष विनोद चव्हाण यांनी मायनाक भंडारी यांचा इतिहास कथन करून राज्याच्या कारकिर्दीतील आरमारप्रमुख सर्वांच्या डोळ्यासमोर उभे केले.मनोहर पालयेकर यांनी मायनाक भंडारी यांचे ठिकठिकाणी बॅनर लावून जनमानसात चळवळ निर्माण करावी, असे सुचित केले. दिवाकर मालवणकर यांनी 'चला कलाकार घडवूया'  असा कार्यक्रम जिल्ह्यात राबवावा, असे सुचित केले.
   महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी 'चला कलाकार घडवूया' च्या माध्यमातून दुसरी फळी समाजात निर्माण करूया , असे सुचित केले. मायनाक भंडारी च्या माध्यमातून शस्त्रओळख ,सायकल स्पर्धा , मॅरेथॉन स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रम करिता महासंघाच्या वतीने राबवित असलेल्या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.4 डिसेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी त्या त्या तालुक्यात बॅनरबाजी करण्याचे निश्चित करण्यात आले. सदर कार्यक्रमांस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महासंघ व तालुका मंडळ यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमांस उपस्थित रहावे, यादृष्टीने शासनाकडून पास मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे सरचिटणीस विकास वैद्य यांनी सुचित केले.
   या बैठकीस महासंघाचे विनोद चव्हाण, प्रकाश कांबळी, जगदीश आडवीरकर, गणेश तळेकर, प्रवीण आचरेकर, हेमंत करंगुटकर, तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी,सदस्य, समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.