शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणेंकडून नुकसानीची पाहणी; अचूक पंचनाम्याचे दिले निर्देश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणेंकडून नुकसानीची पाहणी; अचूक पंचनाम्याचे दिले निर्देश

सिंधुदुर्ग, दि. २७

 

         जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी नुकसानीची अचूक आकडेवारी आणि वस्तुनिष्ठ माहिती वेळेत शासनापर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. प्रशासनाने अचूक पंचनामे करून शासनाच्या सवलती पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री राणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सरपंच रसिका केळुसकर, प्रगतशील शेतकरी विजय होडावडेकर व स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाचा खंड आणि पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.विहिरींमधील पाणीपातळी, मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस आणि ओवाळवरील बंधाऱ्याचीही त्यांनी पाहणी केली. पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हामुळे भात पीक करपल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, "पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते अडवणे व जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. गावपातळीवर लहान बंधारे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे."शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, मात्र त्यासाठी जिल्ह्यातील नुकसानीची अचूक माहिती वेळेत शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.