प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत निकाली काढा......समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना निर्देश
सिंधुदुर्ग, दि. २६
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२५-२६ मधील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभागाने दिले आहेत.यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्पुरते सक्रिय ठेवण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांच्या प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य देऊन विहित मुदतीत अर्ज निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाडीबीटी २.० पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, मागील वर्षांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित असल्याने त्यांचा निपटारा करण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल सुरू ठेवण्यात आले आहे.दरम्यान, ‘Sent Back’ करण्यात आलेल्या अर्जांसाठी सध्या ‘Re-Apply’ सुविधा स्थगित असून महाडीबीटी १.० वरील प्रक्रिया आणि डेटा मायग्रेशन पूर्ण झाल्यानंतर हे अर्ज महाडीबीटी २.० वर पुन्हा सादर करता येणार आहेत.३० सप्टेंबर २०२६ नंतर महाडीबीटी १.० वर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवीन अर्ज केवळ महाडीबीटी २.० वरच करता येतील.प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली न काढल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय आणि प्राचार्यांची राहील, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
konkansamwad 
