माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ‘आनंदयात्री’ तर्फे सत्कार

माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ‘आनंदयात्री’ तर्फे सत्कार

 


वेंगुर्ला

 

      स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने  वेंगुर्ला नगरपरिषदकडून उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा 'आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला’ परिवारातर्फे अध्यक्षा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या विचारांनी प्रेरित होऊन वेंगुर्ल्यात स्मारक व्हावे, यासाठी ‘आनंदयात्री’ तर्फे करण्यात आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत चव्हाण यांनी हा उपक्रम शासनस्तरावर मार्गी लावला. त्यांच्या पुढाकारातून साकारलेले स्वामी विवेकानंद हॉल हे आता वेंगुर्ल्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्रबिंदू ठरत आहे. सत्कार समारंभात बोलताना ‘आनंदयात्री’ च्या अध्यक्षा वृंदा कांबळी म्हणाल्या की, “हा हॉल म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांचा ध्वज आहे. हे स्मारक वेंगुर्ला शहराला नवचैतन्य देणारे ठरेल.”
          या प्रसंगी चव्हाण यांनी ‘आनंदयात्री’ च्या कार्याचे कौतुक करत, “विवेकानंदांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणारे हे कार्य प्रेरणादायी असून, या हॉलमधून नव्या पिढ्यांना दिशा मिळेल,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक आणि आनंदयात्री सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, खजिनदार महेश राऊळ, सदस्य पी. एस. कौलापुरे, विद्या कौलापुरे, प्रितम ओगले, चारुता दळवी, पि. के. कुबल, सीमा मराठे, विशाखा वेंगुर्लेकर, चैतन्य दळवी आदी आनंदयात्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.